
कॅनबेरा, 27 ऑक्टोबर (हिं.स.)ऑस्ट्रेलियाचा नियमित कसोटी कर्णधार पॅट कमिन्स इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या अॅशेस कसोटीतून बाहेर पडला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याची माहिती दिली आहे. कमिन्स अद्याप पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नसल्यामुळे पहिल्या अॅशेस कसोटीला मुकणार असे मानले जात होते. वेगवान गोलंदाजाची अनुपस्थिती ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का आहे, कारण ते इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत.
कमिन्सच्या अनुपस्थितीत, स्टीव्ह स्मिथ पहिल्या अॅशेस कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, पॅट कमिन्स लवकरच आपल्या पुनरागमनाच्या तयारीत गोलंदाजी पुन्हा सुरू करेल. जुलैमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीनंतर ३२ वर्षीय खेळाडू तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपासून खेळलेला नाही. त्यानंतर कमिन्सला न्यूझीलंड आणि भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतूनही बाहेर रहावे लागले होते.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये हा वेगवान गोलंदाज संपूर्ण अॅशेस मालिकेसाठी उपलब्ध असेल की, नाही याबद्दल चिंता आहे. पण कमिन्स लवकरच गोलंदाजी पुन्हा सुरू करेल अशी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची घोषणा सूचित करते की, तो मालिकेचा भाग असेल. कमिन्सला पूर्णपणे तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. कारण शेवटचे तीन अॅशेस कसोटी सामने तीन आठवड्यांत खेळले जाणार आहेत. तिसरी कसोटी १७ डिसेंबर रोजी अॅडलेडमध्ये सुरू होईल आणि मालिका ४ जानेवारी रोजी सिडनीमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्याने संपेल. सामन्यांमधील कमी वेळ पाहता, ऑस्ट्रेलिया कमिन्सच्या कामाचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करेल अशी अपेक्षा आहे.
पर्थमधील मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी कमिन्सची जागा स्कॉट बोलँड घेण्याची शक्यता आहे. मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड हे वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करणार आहेत. ज्यांना अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन आणि ब्यू वेबस्टर यांची साथ मिळणार आहे. पण हेझलवूडच्या तंदुरुस्तीबद्दल चिंता कायम आहे. या स्टार वेगवान गोलंदाजाने गेल्या आठ वर्षांत पाच सामन्यांच्या मालिकेतील सर्व पाचही कसोटी सामने फक्त एकदाच खेळले आहेत. अलीकडेच सिडनीमध्ये संपलेल्या भारताविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला बोटाला दुखापत झाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे