

नाशिक, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। शनिवार १ नोव्हेंबर् २०२५ पासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र व सौराष्ट्र या चार दिवसीय रणजी ट्रॉफीच्या सामन्यात शुक्रवारी रात्री पडलेला पाऊस , शनिवारी दिवसभर बहुतांश वेळ राहिलेले ढगाळ हवामान व एक दोन वेळा हलक्या पावसाच्या सरी आल्यामुळे पहिल्या दिवशी खेळ सुरू होऊ शकला नाही .
सकाळी नियोजित वेळेनुसार नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रणजी सामन्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत हवेत फुगे सोडून औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जि. प. मुख्याधिकारी अंकुश पवार आवर्जून उपस्थित होते . त्यांच्या हस्ते बीसीसीआयचे सामनाधिकारी एस. डॅनियल मनोहर , पंच साईधर्शन कुमार व तन्मय श्रीवास्तव, खेळपट्टी तज्ञ - क्युरेटर टी, मोहानन, महाराष्ट्र क्रिकेट डायरेक्टर शॉन विल्यम्स , दोन्ही संघांचे मुख्य प्रशिक्षक हर्षद खडीवाले व पृथ्वीपाल सिंग सोळंकी , कर्णधार अंकित बावणे व जयदेव उनाडकट यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी बीसीसीआयने नाशिकला रणजी सामना आयोजित करण्यास परवानगी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले व दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या. सर्व मान्यवर पाहुण्यांनी दोन्ही संघाच्या खेळाडूंची ओळख करून घेतली. समवेत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे आणि इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.या छोट्याशा आटोपशीर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सेक्रेटरी समीर रकटे यांनी केले व सर्वांचे आभार मानले.
पण सुरवातीला म्हटल्यानुसार खराब हवामानामुळे दोन्ही पंचांनी सकाळी नऊ , अकरा , दुपारी एक व त्यानंतर पुन्हा दुपारी तीन वाजता मैदानाची सखोल पाहणी केली. पण ढगाळ हवामान व एक दोन वेळा हलक्या पावसाच्या सरी आल्यामुळे सर्व मैदानकर्मचाऱ्यांनी भरपूर मेहनत करून देखील परिस्थितीत विशेष समाधानकारक सुधारणा झाली नाही. अखेर आजच्या दिवसाचा खेळ सुरू होऊ शकला नाही. उद्या सकाळी दोन्ही पंच मैदानाची पाहणी करून आपला निर्णय जाहीर करतील.आज क्रिकेट रसिकांनी व खास करून कुमारवयीन व युवा चाहत्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूंची सराव करतानाची झलक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. खेळाडू हॉटेलवर परतताना देखील मुख्य प्रवेश द्वारापाशी अनेक जण झलक पाहण्यासाठी वाट पहात थांबले. शनिवारी रात्री पाऊस न आल्यास व रविवार सकाळ पासून सूर्यदर्शन झाल्यास दुसऱ्या दिवासपासून खेळ सुरू होण्याची सर्वांनाच अपेक्षा आहे. सर्वच क्रिकेट रसिक या रणजी ट्रॉफी सामना सुरू होण्याची आतुरतेने वाट पहात आहेत.या आधीच सांगितल्यानुसार सामना बघण्यासाठी मोफत सुविधा राहणार असून त्र्यंबक रोड वरील सिव्हिल हॉस्पिटल समोरील मुख्य द्वार तसेच गेस्ट हाऊस कडील द्वाराने मैदानावर प्रवेश करता येणार आहे. पार्किंग साठी ईदगाह मैदानाचा वापर करता येणार आहे.आतापर्यत फक्त परदेशात उपलब्ध असलेल्या लॉनवर बसून सामना बघण्याची सोय आता नाशिककरांना देखील झाल्यामुळे रसिकांना या खास टेकडावरील हिरवळीवर बसून सामना बघण्याचा आनंद लुटता येणार आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV