
सोलापूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.) : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याच्या कुसळंब येथील तरुणाने चक्री गेमच्या नादात कर्जाचा डोंगर झाल्याने मध्यरात्री आत्महत्या केली. समाधान तुकाराम ननवरे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सदर तरुणाने 7 वर्षांपासून शिवाजीनगर भागात कॉलेज रस्त्यावर डायमंड सलूनचे दुकान समाधान याने थाटले होते. पण या तरुणाला मोबाईलवरील चक्रीगेमचे व्यसन लागले. रात्री उशिरापर्यंत गेम खेळत असत कधी लाख रुपये येत तर कधी दोन लाख जात असत. अनेक मित्रांकडून पैसे घेत असे आणि परतावाही करत असे. पतसंस्था, बँक, खासगी सावकार यांच्याकडून पैसे घेतले होते. मोठी उलाढाल पाहून ऑनलाइन कंपन्यांनीही त्याला कर्ज दिले होते.आई सीताबाई ननवरे पहाटे पाचच्या सुमारास पाणी गरम करण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या असता समाधान याने स्लॅबच्या लोखंडी हुकला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी हंबरडा फोडला. त्याच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी, पत्नी, तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड