
रायगड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन सुकापुर (पनवेल) येथे सह्याद्री संस्थेच्या वतीने मोफत सर्वरोग निदान व उपचार महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा उद्देश गोरगरीब आणि गरजूंना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, समाज व्याधीमुक्त ठेवणे आणि आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणे हा होता.
तक्षशिला बुद्ध विहाराच्या प्रांगणात शुश्रुषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचे उद्घाटन सह्याद्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार कांबळे यांच्या हस्ते झाले. शिबिरात विभागातील शेकडो नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि विविध वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला.
शुश्रुषा हॉस्पिटलच्या डॉ. रत्नमाला यांनी रुग्णांची तपासणी करून आरोग्य मार्गदर्शन केले, तर डॉ. दत्तात्रय वाघमोडे यांच्या पथकाने डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्म्यांचे वाटप केले. बोरीवली येथील डेफिन फाउंडेशनच्या वैशाली सावंत यांनी महिलांना स्वयंरोजगार आणि व्यवसाय संधींबाबत मार्गदर्शन केले. महिला व बालरोग तज्ज्ञांनीही रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार दिले. तसेच उपस्थित नागरिकांसाठी आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची सोयही करण्यात आली.
कार्यक्रमास उपसरपंच, पत्रकार, बौद्धाचार्य यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार कांबळे आणि सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराच्या माध्यमातून समाजातील शेकडो नागरिकांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळाली.
------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके