रायगड : उरणमध्ये गॅस सिलेंडरच्या अवैध भरणा केंद्रावर छापा
रायगड , 28 ऑक्टोबर (हिं.स.): जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे उल्लंघन करून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस काढून त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या रॅकेटवर उरण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि पोलिसांच्य
रायगड : उरणमध्ये गॅस सिलेंडरच्या अवैध भरणा केंद्रावर छापा


रायगड , 28 ऑक्टोबर (हिं.स.): जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे उल्लंघन करून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस काढून त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या रॅकेटवर उरण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या या कारवाईत तीन चालकांसह एकूण चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तब्बल 24 लाख 12 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नवी मुंबई जिल्ह्यातील उरण तालुक्यातील द्रोणागिरी येथील सेक्टर 50 येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी व्यावसायिक गॅस सिलेंडरमधील (भारत गॅस) गॅस एका लोखंडी पाईपच्या साहाय्याने काढून तो इतर रिकाम्या सिलेंडरमध्ये भरून त्यांची अनधिकृतपणे विक्री करत होते. प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रभाकर पद्द्माकर नवाळे यांच्या लेखी तक्रारीवरून उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

छाप्यादरम्यान पोलिसांनी भारत गॅसचे एकूण 277 व्यावसायिक सिलेंडर (यात भरलेले आणि रिकामे दोन्ही समाविष्ट आहेत) आणि एच.पी. कंपनीचे 5 किलो वजनाचे 60 भरलेले व 8 रिकामे घरगुती सिलेंडर, 1 टाटा टेम्पो 1112 आणि 2 महिंद्रा बोलेरो जीप, अवैध गॅस भरण्यासाठी वापरण्यात आलेला लोखंडी पाईप असा माल जप्ते केला आहे. त्याची एकूण किंमत 24 लाख, 12 हजार, 500 रुपये आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी तीन आरोपींना प्रत्यक्ष घटनास्थळी अटक करण्यात आली. बालाजी धोंडीबा साळवी (वय 40), मनोहर गणेश गोंड (वय 36), सुरेशकुमार सखाराम माजरा (वय 30) यांना अटक करण्यात आली आहे. या चौघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 च्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्मिता अशोक पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.-----------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande