
अकोला, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।अकोल्यातील बहुचर्चित अक्षय नागलकर हत्याकांड प्रकरणात तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रकरणातील आठही आरोपी पोलिस कोठडीत असून, अकोला पोलिसांनी आरोपींना सोबत घेत घटनास्थळाची पाहणी केली. आरोपींकडून अक्षय नागलकरची हत्या नेमकी कशी झाली, हत्या झाल्यानंतर मृतदेह कुठे नेण्यात आला आणि पुरावे कसे नष्ट करण्यात आले, याची सविस्तर परेड घेण्यात आली.
दरम्यान, आरोपींनी चौकशीत अक्षय नागलकरचा मोबाईल मोर्णा नदीच्या पात्रात फेकल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने गोताखोर नदीत उतरले असून मोबाईल व इतर पुरावे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार असून, त्याचा शोध मोबाईल लोकेशनच्या आधारे सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते.
हत्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. मात्र, तपास अधिक गतीमान करण्यात आला असून, मृतदेह जाळलेल्या ठिकाणासह हत्या झालेल्या स्थळाची आरोपींकडून पुनरावृत्ती करण्यात आली. तसेच मृतदेहाची राख कुठे फेकण्यात आली, याचाही तपास सुरू आहे. अक्षय नागलकर प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी आणखी तपासाची गती वाढवली असली तरी सखोल तपास केल्यानंतर या प्रकरणात लवकरच महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे