
सोलापूर, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। सोलापूर शहरात गांजाची नशा वाढत असून मागील साडेनऊ महिन्यात पोलिसांत सुमारे ४६ गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत सोलापूर शहर पोलिसांनी तब्बल ९१ किलो गांजा जप्त केला आहे. त्याची अंदाजे किंमत २० लाखांपर्यंत आहे. चोरी, हाणामारी, शिवीगाळ, कौटुंबिक वादासह इतर किरकोळ गुन्ह्यातील काही संशयित आरोपी गांजाची नशा करतात, असेही आढळून आले आहे.सोलापूर शहरातील सुपर मार्केट परिसर, भवानी पेठ व अन्य ठिकाणी गांजा मिळतो असे सांगितले जाते.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून व शेजारील कर्नाटकातून शहरात अवैधरीत्या गांजा विक्रीसाठी येतो. विजापूर नाका, फौजदार चावडी, सदर बझार, जेलरोड, जोडभावी पेठ, एमआयडीसी पोलिसांनी त्यासंदर्भात यापूर्वी कारवाया केल्या आहेत. पोलिसांना त्या कारवायांमध्ये तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आढळला. अल्पवयीन मुलांपासून अगदी खूपच तरुण मुले या अवैध व्यवसायाने बिघडत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड