
सोलापूर, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। कोरफळे (ता. बार्शी) येथे एक एकर द्राक्ष बागेवर तणनाशक फवारल्याने बागेची पाने गळू व सुकू लागली. याबाबत कृषी विभाग व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार सुमारे ११ लाख रुपयांचे द्राक्षबागेचे नुकसान केल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. किरण लिंबा बरडे (वय ५५, रा. कोरफळे, ता. बार्शी) यांनी अज्ञात इसमाविरोधात फिर्याद दाखल केली.
फिर्यादीत म्हटले आहे, की कोरफळे येथे किरण बरडे यांची एक हेक्टर २१ गुंठे शेती असून, त्यापैकी गट नं. १८३ मध्ये एक एकर माणिक चमन जातीची द्राक्षबाग आहे. बागेची लागण मागील चार वर्षांपूर्वी केली असून, बाग स्वत: किरण बरडे बघतात. द्राक्ष बागेवर यापूर्वी प्रत्येक ऑक्टोबर छाटणीवेळी कोणीतरी अज्ञात तणनाशक कोवळ्या फुटलेल्या बागेवर फवारणी करून नुकसान करत असे. परंतु बागेत किरण बरडे यांच्या चुकीने कोणते तरी औषध फवारणी केल्यामुळे बाग जळत असेल, असे वाटत होते. व्यापाऱ्याला बाग दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोणीतरी अज्ञात बागेतील द्राक्ष पिकावर काटाड्या फिरवून मालाचे खूप मोठे नुकसान केले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड