गडचिरोली, 3 ऑक्टोबर (हिं.स.)
अहेरी इस्टेटचा २०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला दसरा महोत्सव अहेरी इस्टेटचे ६ वे राजे श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम ह्यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र, तेलंगाणा, आणि छत्तीसगड ह्या तीन राज्यांतील हजारो भाविकांची या महोत्सवाला उपस्थिती होती.
या ऐतिहासिक प्रसंगी बोलताना राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी 'दसरा' ही आपली ऐतिहासिक संस्कृती असून, ती गेल्या २०० वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे आणि समोरही शेकडो वर्षे चालू राहील, असा विश्वास व्यक्त केला.
विरोधकांवर जोरदार घणाघात
राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार घणाघात केला. अहेरी इस्टेटचा दसरा महोत्सवाचे महत्त्व कमी व्हावे यासाठी काही लोकं अनेक प्रयत्न करीत आहेत, ते कदापी यशस्वी होणार नाही, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले
त्याचबरोबर, त्यांनी आपल्या मतदारसंघातील सध्याच्या परिस्थितीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सध्या आपल्या क्षेत्रात सर्वत्र रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही, असे म्हणत त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्राची गेल्या ६ वर्षात प्रचंड दुरावस्था झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. या परिस्थितीला जबाबदार कोण आहे... ह्याचा विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची वेळ जनतेवर आली आहे, असे सांगत माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी जनतेला योग्य विचार करण्याची वेळ आली असल्याचे सूचित केले.
पारंपारिक विधी
दसरा महोत्सवाच्या दिवशी परंपरेप्रमाणे सकाळी साईबाबा पालखी अहेरी राजनगरीच्या मुख्य मार्गाने राजेंच्या उपस्थितीत काढण्यात आली. तर सायंकाळी, ऐतिहासिक पालखीत विराजमान होऊन श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी सीमोल्लंघन केले. गडअहेरी येथे शमीच्या वृक्षांचे तसेच गडी मातेचे पूजन केल्यानंतर पालखी राजमहालात परत आली. यावेळी मंचावर कुमार अवधेशरावबाबा आत्राम, प्रवीणबाबा आत्राम,राजपुरोहित ओंकार पंडित व अहेरी राजपरिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते.
• राजे अम्ब्रिशराव आत्राम - युवा नेतृत्वाचा परिचय.
२०० वर्षांची परंपरा असलेल्या अहेरी राजघराण्यात राजे अम्ब्रिशराव आत्राम हे ६ वे राजे म्हणून गादीवर विराजमान आहेत. धर्मराव महाराज, भुजंगराव महाराज, श्रीमंत धर्मराव महाराज, विश्वेश्वरराव महाराज आणि सत्यवानराव महाराज यांच्या नंतर त्यांनी गादीची परंपरा पुढे चालवली आहे.
राजे सत्यवानराव महाराज यांच्या निधनानंतर, अवघ्या २५ व्या वर्षी राजे अम्ब्रिशराव महाराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटात पार पडला. नागपूर, पुणे, पंचगणी येथील नामांकित शाळांमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी इंग्लडमधून बिझनेस लॉची पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावामुळे ते युवा पिढीच्या हृदयात मानाचे स्थान मिळवून लोकप्रिय झाले आहेत. ८०% समाजकारण आणि २०% राजकारण करून या आदिवासीबहुल भागाचा कायापालट करण्याचा त्यांचा मानस आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond