रायगड, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।आगरी समाज संस्था, अलिबाग यांनी समाजकार्यातील आपली परंपरा जोपासत आधुनिकतेकडे टाकलेले पाऊल हा एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे. समाजाच्या विवाह व्यवस्थेला नवे स्वरूप देत संस्थेच्या सर्वजातीय वधू-वर परिचय केंद्राला डिजिटल रूप देण्यात आले आहे. या निमित्ताने vivahamilan.in या ऑनलाईन विवाह मिलन पोर्टलचा शुभारंभ हॉटेल गुरुप्रसाद हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
संस्थेने उभारलेले हे डिजिटल व्यासपीठ विवाहासाठी योग्य वधू-वर शोधण्याच्या प्रक्रियेत नवे युग आणणारे ठरणार आहे. पारंपरिक वधू-वर मेळाव्यांच्या पलीकडे जात आता स्मार्टफोन व संगणकावर काही क्लिकमध्येच मुलामुलींची माहिती मिळविणे शक्य होणार आहे. यामुळे समाजातील तरुण पिढीला वेळ वाचवून योग्य जोडीदार शोधणे अधिक सोपे होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या पोर्टलमुळे विवाह व्यवस्थेत पारदर्शकता, वेग आणि सोयीसुविधा वाढतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच ग्रामीण भागातील युवक-युवतींनाही याचा मोठा फायदा होईल, असे मत मान्यवरांनी मांडले.
या पोर्टलचे उद्घाटन डॉ. जगन्नाथ पाटील व डॉ. दीपक पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी समाजातील मान्यवर सुजाता म्हात्रे, मंगेश म्हात्रे, रणजीत म्हात्रे, प्रविण घरत, अँड. प्रसाद पाटील, प्रसाद पाटील, सुरेश पाटील, धनंजय म्हात्रे, अनंत म्हात्रे, राजेश पाटील, सतिश पाटील, विलास ठाकूर, सुनील तांबडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाने आगरी समाजाच्या विवाह व्यवस्थेत डिजिटल युगाची सुरुवात झाल्याची भावना सर्व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. समाजहिताच्या या उपक्रमाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके