रायगड, 3 ऑक्टोबर (हिं.स.) :
डिजिटल व ऑनलाइन शिक्षणाच्या युगात लाकडी-प्लास्टिक पाटीचा वापर कालबाह्य ठरत असून तिची जागा आता वहीने घेतली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर रायगड जिल्हा परिषदेसह अनेक शाळांमध्ये पारंपरिक पाटीपूजनाऐवजी ‘वही पूजन’ करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वहीवर सरस्वतीचे चित्र काढून या नव्या परंपरेला स्वरूप दिले.
पूर्वी प्राथमिक शिक्षण पाचवीपर्यंत पाटीवर दिले जात असे. त्यानंतर वहीवर अभ्यास सुरू होई. परंतु गेल्या काही दशकांत शिकविण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. डिजिटल साधनांचा वापर, ऑनलाइन वर्ग तसेच मोबाईल अॅप्सद्वारे शिक्षण देण्यावर भर वाढला. परिणामी काळ्या रंगाची पाटी दप्तरातून नाहीशी होत आहे. तरीही घरचा अभ्यास वहीतच लिहिण्याची परंपरा कायम असल्याने वहीचे महत्त्व टिकून आहे.
दसऱ्यानिमित्त गुरुवारी शाळांमध्ये पारंपरिक वातावरणात पूजन झाले. विद्यार्थ्यांनी घरून सजविलेली वही, पेन्सिल, पेन, फुले, तांदूळ, अबीर-गुलाल आणला. सकाळी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी एकत्र रांगेत बसून सरस्वती पूजन केले. या निमित्ताने मोबाईलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांना वेगळा आनंद मिळाल्याचे चित्र दिसले.काही शाळांमध्ये मात्र जुन्या पद्धतीप्रमाणेच पाटीपूजन करण्यात आले. तरीही बहुतेक शाळांनी वहीपूजन करून बदलत्या काळाला साजेसा नवा संदेश दिला. “वहीचा वापर केवळ अभ्यासापुरता न ठेवता विद्यार्थ्यांनी तिचे पूजन करणे म्हणजे ज्ञानाला सन्मान देणे आहे,” असे एका शिक्षकांनी सांगितले.या निमित्ताने पारंपरिक संस्कृती व आधुनिकता यांचा संगम साधला गेला असून, ‘ज्ञानदेवता सरस्वती’चे पूजन विद्यार्थ्यांनी हर्षोल्हासात केले. पाटीऐवजी वहीच्या पूजनाने जुन्या परंपरेला नवा आयाम मिळाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके