अकोल्यात शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन
अकोला, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई यासह ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा आदी मागण्यांसाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. अकोल्यातही शेतकऱ्
P


अकोला, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।

राज्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई यासह ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा आदी मागण्यांसाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. अकोल्यातही शेतकऱ्यांनी अनोख्या पध्दतीने आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळाले. जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढला.

राज्यभरात आलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहिर करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या राजनापूर खिनखीनी येथील शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आक्रमकपणे आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न होत यावेळी मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, नुकसान भरपाई म्हणून मराठवाडा च्या धर्तीवर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी याना दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande