राज्यभरात १० हजारांहून अधिक उमेदवारांना मिळणार शनिवारी नियुक्तीपत्रे
मराठवाडा विभागात 1710 जणांना नियुक्ती छत्रपती संभाजीनगर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। अनुकंपा तत्वारील गट क व गट ड मधील तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेले अशा तब्बल १० हजार ३०९ उमेदवारांना राज्यभरात शनिवार दि.४ रोजी निय
राज्यभरात १० हजारांहून अधिक उमेदवारांना मिळणार शनिवारी नियुक्तीपत्रे


मराठवाडा विभागात 1710 जणांना नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।

अनुकंपा तत्वारील गट क व गट ड मधील तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेले अशा तब्बल १० हजार ३०९ उमेदवारांना राज्यभरात शनिवार दि.४ रोजी नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. त्यात जिल्ह्यातील २९६ जणांचा समावेश असून त्यात १५४ अनुकंपातत्वारील तर १४२ सरळसेवा भरतीतील उमेदवारांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम हा शनिवार दि.४ रोजी सकाळी १० वा. संत एकनाथ रंगमंदिर, उस्मानपुरा येथे होणार आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण होणार आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना या कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस आयुक्त प्रवीण पवार,पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच अन्य प्रशासकीय विभागप्रमुख या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

मुंबई येथून होणारा मुख्य सोहळा दुरदृष्यप्रणालीने याठिकाणी दाखवण्यात येणार असून मुंबई येथील सोहळ्यासोबतच जिल्ह्यातील उमेदवारांना नियुक्तीपत्रे वाटप केली जाणार आहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपाप्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी 5122 एमपीएससीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार असून, एकाच दिवशी 10,309 उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील. अशाप्रकारचा हा इतिहासातील एक अनोखा कार्यक्रम ठरेल. 4 ऑक्टोबरला मुख्य कार्यक्रम हा मुंबईत होईल आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील, तर पालकमंत्री आपआपल्या जिल्ह्यात नियुक्तीपत्रे वितरित करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी 100 दिवस आणि नंतर 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या हाती घेतलेल्या कार्यक्रमातील हा महत्त्वाचा टप्पा होता.

यासोबतच एमपीएससीतर्फे परीक्षा घेण्यात आलेल्या लिपीक-टंकलेखक श्रेणीतील 5122 उमेदवारांना सुद्धा नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. एकूण 10,309 उमेदवारांपैकी सर्वाधिक 3078 उमेदवार हे कोकण विभागातील असून, 2597 हे विदर्भातील आहेत. पुणे विभागात 1674, नाशिक विभागात 1250, तर मराठवाड्यातील 1710 उमेदवार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande