चंद्रपूर, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्य शासनाने 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपाधारकांना नियुक्ती देणे, या बाबीचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे सर्व जिल्ह्यांमध्ये ही कार्यवाही पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील 202 अनुकंपाधारक आणि 83 सरळसेवा भरती उमेदवार, असे एकूण 285 जणांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते देण्यात येईल. या कार्यक्रमाचे आयोजन 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले आहे.
अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या गरजू कुटुंबांसाठी शासनाकडून एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. अनुकंपा तत्वावरील नियुक्ती प्रक्रियेला गती देऊन जिल्हा प्रशासनाने शेकडो कुटुंबांच्या जीवनात आशेचा नवा किरण आणला आहे. या नियुक्तीमुळे केवळ नोकरीच नाही, तर ज्या कुटुंबाने आपल्या कर्त्या पुरुषाला गमावले आहे, त्या कुटुंबांना मोठा भावनिक आणि आर्थिक आधार मिळाला आहे. हे नियुक्तीपत्र म्हणजे केवळ एक शासकीय कागद नसून, ते एका कुटुंबाच्या उज्वल भविष्याची पुनर्स्थापना आहे.
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या परिश्रमांमुळे अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लागली आहेत. यात जिल्ह्यातील अनुकंपा तत्वावरील गट – 3 आणि गट - 4 च्या 202 उमेदवारांना तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या लिपीक – टंकलेखक (गट - 3) च्या 83 उमेदवारांना असे एकूण 285 जणांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहे.
अनुकंपाधारक उमेदवारांमध्ये राज्य शासनाच्या वतीने गट – ‘क’ चे 59, गट – ‘ड’ चे 69 (दोन्ही मिळून 128 उमेदवार), जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाच्यावतीने गट – ‘क’ चे 21, गट – ‘ड’ चे 26 (47 उमेदवार), नगर विकास विभाग, महानगरपालिका / नगरपालिका / नगर परिषदेच्या वतीने गट – ‘क’ चे 12, गट – ‘ड’ चे 15 (27 उमेदवार) असे 202 अनुकंपाधारक तर सरळ सेवा भरती द्वारे लिपीक – टंकलेखक म्हणून नियुक्ती झालेले 83 उमेदवार असे एकूण 285 जणांचा समावेश आहे.
यापूर्वी, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आणि अधीक्षक नरेश बहिरम यांच्या मार्गदर्शनात 3 सप्टेंबर 2025 रोजी अनुकंपाधारकांचा मेळावा आणि 13 सप्टेंबर 2025 रोजी सरळसेवा अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. यात उपलब्ध पदे, शैक्षणिक अहर्ता, पात्रता, वेतनश्रेणी, कामाचे स्वरूप, पदोन्नतील संधी, विशेष प्राविण्य, तंत्रज्ञ, शासकीय सेवेची जबाबदारी व कर्तव्य आदी माहिती देण्यात आली होती. या समुपदेशनामुळे शासकीय नोकरीत येणा-या नवनियुक्त उमेदवारांचे मनोबल उंचावण्यास मदत झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव