चंद्रपूर, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। मोतिबिंदू हा मुख्यत: डोळयांच्या नैसर्गिक लेन्समध्ये होणाऱ्या बदलामुळे होतो. ज्यामुळे दृष्टि ढगाळ किंवा धुरकट दिसते. मोतिबिंदु होण्याचे सर्वात माठे कारण म्हणजे वाढते वय. चाळिशी नंतर हा आजार सुरु होऊ शकतो. या व्यतिरीक्त डोळयांना दुखापत, अनुवंशिक आजार, मधुमेह, जीवनशैली अशा इतर कारणामुळे डोळयातील तंतुच्या रचनेत बदल झाल्यामुळे लेन्सच्या पेशिचे विघटन होते. त्यामुळे मोतिबिंदू होतो व नागरिकांना अंधत्वाचा सामना करावा लागतो.
हीच गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष तथा धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, शासनाचे विविध विभाग/यंत्रणा तसेच राज्यातील सेवाभावी संस्था /दाते यांच्या संयुक्त विद्यमाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधित ‘नमो नेत्र संजीवनी स्वास्थ अभियान’ राबविण्याचे ठरले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनात व अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर यांचे समन्वय, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. तारासिंग आडे, यांच्या पुढाकारात चंद्रपूर जिल्हयात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने ‘नमो नेत्र संजीवनी स्वास्थ अभियान’ राबविण्यात आले.
याकरीता गाव पातळीपर्यंत अभियानाची माहिती देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात तसेच महानगरपालिका क्षेत्रात शिबिरे आयोजित करून विविध वयोगटातील व्यक्तींची नेत्रतपासणी व निदान करण्यात आले. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधित एकूण 40 शिबिरे घेण्यात आले. यात 5710 रुग्णांची तपासणी व 1509 रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच शिबिरातील ज्या रुग्णांना चष्म्याचे नंबर लागलेले आहे अशा 3299 रुग्णांना घरपोच चष्मे शासनामार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहे. दोन्ही डोळ्यांनी अंध रुग्णांना 24 अंध काठी वितरीत करण्यात आल्या. 1597 इच्छुक नेत्रदात्यांकडून नेत्रदान संमतीपत्र भरून घेण्यात आले.
या अभियानात खाजगी नेत्रशल्य चिकित्सक तसेच स्वंयसेवी संस्था यांचे सुध्दा मोलाचे सहकार्य लाभले, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव