निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची नागपुरात ४ व ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
मुंबई, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महानगरपालिका क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेचे उद
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची नागपुरात ४ व ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा


मुंबई, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महानगरपालिका क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार आहेत. दिनांक ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता उद्घाटन होणार असून संविधानाला अभिप्रेत विकेंद्रित लोकशाही व महानगरपालिकांमधील राजकारण, या विषयावर प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मार्गदर्शनपर संबोधन करतील.

शहरी प्रश्न, सक्रियता आणि राजकारण, या विषयावर विवेक वेलणकर मार्गदर्शन करतील तर सत्र संचलन संग्राम खोपडे करतील. आजचे बदलते शहरी राजकारण आणि आपण, या विषयावर आशितोष शिर्के, राजू भिसे, संग्राम खोपडे हे सत्र संचालन करतील. घरपट्ट्यांची चळवळ या विषयावर संवाद व शहरांकरता भविष्यातील कार्यक्रम या मुद्द्यांवर चर्चा होईल. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील आणि नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे स्वागत करणार आहेत तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी करणार आहेत.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत मार्गदर्शन करणार आहेत. शहरातील सांस्कृतिक राजकारण, शहरी नॅरेटीव व लोकसंवादातून लोकचळवळ या मुदद्यांचाही यावेळी उहापोह केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande