छत्रपती संभाजीनगर, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)।धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले असून, संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या मागणीसाठी आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. कुलदीप (धिरज) आप्पासाहेब कदम-पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री आणि कृषी मंत्री यांना सादर करण्यात आले. सरकारने येत्या आठ दिवसांत मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या: जिल्ह्यातील ओल्या दुष्काळामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असल्याचे काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे. पंजाब सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis