छत्रपती संभाजीनगर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।
धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच अत्याधुनिक 'कार्डियाक कॅथलॅब' उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाने प्रशासकीय मान्यता दिली असून, सुमारे १९ कोटी ४७ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आता हृदयविकाराशी संबंधित गुंतागुंतीच्या तपासण्या आणि उपचारांसाठी रुग्णांना सोलापूर, पुणे किंवा मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही.
राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने २३ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, सन २०२५-२६ च्या राज्य योजनेअंतर्गत राज्यातील ११ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 'टर्न की' तत्त्वावर कार्डियाक कॅथलॅब युनिट उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे.
कॅथलॅब हे एक विशेष परीक्षा आणि उपचार कक्ष आहे, जिथे हृदयाच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचे निदान आणि उपचार केले जातात. यामध्ये अँजिओग्राफी (Angiography) आणि अँजिओप्लास्टी (Angioplasty) यांसारख्या महत्त्वाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. आतापर्यंत या सुविधांसाठी धाराशिव जिल्ह्यातील रुग्णांना मोठ्या शहरांवर अवलंबून राहावे लागत होते, ज्यात वेळ आणि पैसा दोन्ही मोठ्या प्रमाणात खर्च होत असे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वाढणारी रुग्णसंख्या आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. धाराशिवमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे केवळ रुग्णांची सोय होणार नाही, तर येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही हृदयविकार उपचारांचे प्रगत प्रशिक्षण मिळेल. यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये एक मैलाचा दगड रोवला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis