वृक्ष प्रतिष्ठान, लातूर कडून उजेड येथील गरजू कुटुंबांना मदतीचा दिलासा
लातूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून शिरूर अनंतपाळ तालुक्यावर निसर्गाचा रोष कोसळत असून, सततच्या सततधारपावसामुळे अनेक गावांतील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. काही गावांमध्ये नदीकाठच्या भागांत पाणी शिरल्यामुळे घरातील संसार उध्वस्त झाल
गरजू कुटुंबांना मदत


लातूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।

गेल्या काही दिवसांपासून शिरूर अनंतपाळ तालुक्यावर निसर्गाचा रोष कोसळत असून, सततच्या सततधारपावसामुळे अनेक गावांतील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. काही गावांमध्ये नदीकाठच्या भागांत पाणी शिरल्यामुळे घरातील संसार उध्वस्त झाला आहे, तर काही कुटुंबं अक्षरशः देशोधडीला लागली आहेत. अशा बिकट परिस्थितीत वृक्ष प्रतिष्ठान, लातूर या सामाजिक संस्थेने उजेड गावातील पूरग्रस्त गरजू कुटुंबांना आधार देत एक प्रेरणादायी मदतकार्य हाती घेतले.

आज वृक्ष प्रतिष्ठानच्या वतीने उजेड येथील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप करण्यात आले. या किट्समध्ये साड्या, कपडे, आंथरूण, पांघरूण आणि दैनंदिन उपयोगाच्या अन्य घरगुती वस्तूंचा समावेश होता. या मदतीमुळे आपला संसार पुन्हा उभा राहील, अशी भावना अनेक पूरग्रस्तांनी व्यक्त केली.

या उपक्रमाचे नेतृत्व वृक्ष प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. सुनंदा जगताप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या उपक्रमासाठी स्थानिक पातळीवरही मोलाचे सहकार्य लाभले. गावातील बालाजी जाधव, प्रकाश जाधव, उत्तमराव कदम, कृष्णकांत चीटुपे, नितीन कदम, बालाजी सगर, रोहित जाधव आणि संतोष खांडेकर या स्थानिक युवकांनी विशेष पुढाकार घेतला. या कार्यक्रमासाठी तरुण भारतचे पत्रकार शंकर मिटकर आणि राजनारायण बिरादार यांच्याकडून उपस्थिती लावण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी उजेड नगरी साप्ताहिकाचे संपादक उत्तमराव कदम यांनी वृक्ष प्रतिष्ठानच्या सर्व महिला सदस्यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. या सत्काराने उपस्थित महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले आणि आज केवळ मदतच नव्हे, तर माणुसकीचा हात मिळाला असे उद्गार काही पूरग्रस्तांनी दिले.

हा उपक्रम म्हणजे केवळ मदतीचे वितरण नव्हे, तर ग्रामीण भागातील गरिबांसाठी एक मोठा आशेचा किरण ठरला आहे. वृक्ष प्रतिष्ठानने दाखवलेले सामाजिक भान आणि सेवा-भावना ही इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande