लातूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।
रामेश्वर - जवळा परिसरात उभारण्यात आलेल्या आपल्या श्री संत गोपाळबुवा महाराज साखर कारखान्याच्या (श्री संत गोपाळ बुवा महाराज शुगर अँड अँग्रौ इंडस्ट्रीज प्रा. लि.) पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, प.पु. विद्यानंद सागर महाराज गातेगावकर, हभप नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर, हभप बाबा महाराज बोराडे काटगावकर आणि हभप लालासाहेब महाराज देवळेकर यांच्यासह सर्व पूज्य संत-महात्म्यांच्या मंगलमय हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या ऐतिहासिक क्षणासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनात गेली पंचवीस वर्षे पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी संघर्ष केला आहे, त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढलो आहे. याच संघर्षातून आणि तुमच्या आशीर्वादाने आपण मला विधानसभेत पाठवले आणि लातूर ग्रामीण मतदारसंघात एक क्रांती घडवली.
शेतकऱ्यांचे अश्रू पुसावेत, त्यांना आधार देता यावा, याच तळमळीतून कराड कुटुंबीयांनी मातीशी जुळलेले नाते जपून, तुमच्या मनातील स्वप्न पूर्ण करण्याचा आणि संत गोपाळ बुवा महाराज साखर कारखान्याची उभारणी करण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा कारखाना म्हणजे केवळ उद्योग नाही, तर शेतकऱ्यांसाठी न्याय आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis