नाशिक, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे राज्यातील पूरग्रस्तांना आवश्यक साहित्याची मदत केली जात असून या संदर्भात गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सदिच्छा भेट घेऊन त्यांना सेवामार्गाच्या या उपक्रमाची माहिती एका निवेदनाद्वारे दिली.
सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने आणि गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांसाठी मदत संकलित करून वाटप केली जात आहे. सेवामार्गाच्या हजारो सेवाकेंद्रांमधील सेवेकरी मदत संकलित करीत असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने मदतीचे नियोजनपूर्वक वाटप सुरू झाले आहे. एक हात मदतीचा या संकल्पनेनुसार मदत गोळा केली जात असून याकरिता पंचसूत्री नियोजन आखण्यात आले आहे.मदतीमध्ये अन्नधान्य,औषधे,कपडे, किराणा या स्वरूपात पूरग्रस्तांना मदत दिली जात आहे.ही संपूर्ण माहिती या भेटीत गुरुपुत्र श्री.मोरे यांनी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांना दिली.मदत वाटप आणि पुनर्वसनाच्या कामामध्ये स्थानिक प्रशासनाचे सहकार्य सेवेकऱ्यांना अपेक्षित असल्याचे गुरुपुत्र मोरे यांनी नमूद केले.आमदार सौ.सीमाताई हिरे यावेळी उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV