कोल्हापूरमधील मराठी साहित्यातील बौद्धिक संपदा मौल्यवान : जिल्हाधिकारी
कोल्हापूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। कोल्हापूर ही महाराष्ट्रातील एक समृद्ध सांस्कृतिक नगरी असून, मराठी साहित्याच्या विश्वात तिचे योगदान अत्यंत मौल्यवान आहे. कोल्हापूरच्या मातीने अनेक ज्येष्ठ लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार आणि विज्ञान लेखक घडवले आहेत, ज्या
अभिजात मराठी दिनात बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे


कोल्हापूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।

कोल्हापूर ही महाराष्ट्रातील एक समृद्ध सांस्कृतिक नगरी असून, मराठी साहित्याच्या विश्वात तिचे योगदान अत्यंत मौल्यवान आहे. कोल्हापूरच्या मातीने अनेक ज्येष्ठ लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार आणि विज्ञान लेखक घडवले आहेत, ज्यांनी ग्रामीण जीवन, सामाजिक मुद्दे, ऐतिहासिक कथा आणि विज्ञानकथा यांवर आधारित साहित्य साकार केले आहे. मराठी साहित्यामध्ये वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत, विश्वास पाटील, ना. धों. महानोर, जयंत नारळीकर अशा अनेक मराठी साहित्यिकांनी मराठी भाषेत अत्यंत मौल्यवान योगदान दिले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा मराठी भाषा समिती व न्यू कॉलेज, मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन न्यू कॉलेज येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनिलकुमार लवटे, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन डॉ.के.जी.पाटील, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ.व्ही.एम.पाटील, जिल्हा मराठी भाषा समिती अध्यक्ष प्रा.डॉ.गुंडोपंत पाटील, उपाध्यक्ष डॉ.एकनाथ पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी म्हणाले, मराठी भाषेचे अभिजातपण अधिक समृद्ध करण्यासाठी लवकरच कोल्हापूरमधील मराठी साहित्यातील बौद्धिक संपदेला आपण अजून पुढे नेण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेऊया. या उपक्रमात डॉ.सुनिलकुमार लवटे यांनी याबाबतचे नियोजन तयार करावे, असेही त्यांनी सांगितले. कोल्हापूरमधील जिल्हा ग्रंथालय शासकीय जागेवर उभारण्यासाठी व ते अधिक ग्रंथसंपन्न करण्यासाठी तातडीने गती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन केले. मराठी भाषेचे दूत म्हणून ओळख निर्माण करा, असे आवाहन केले.

कार्यक्रमातील प्रमुख वक्ते ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनिलकुमार लवटे यांनी मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा भाषेच्या समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. मराठी भाषेचे अभिजातपण टिकवून ठेवण्यासाठी वि.स. खांडेकर, शिवाजी सावंतांसारखे लेखक आताच्या काळातही निर्माण व्हावेत, असे त्यांनी सांगितले. मराठी भाषा अधिक समृद्ध आणि विकसित होण्यासाठी सर्व स्तरांतून नियोजनबद्ध आराखडा निर्माण व्हावा. कोल्हापूरातील मराठी साहित्यातील बौद्धिक संपदा मोठी असून त्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत तसेच अभिजातपणा पुढे नेण्यासाठी अग्रभागी असावे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषा आजच्या काळात युवकांनी मोबाईलच्या अतिवापरातून इंग्रजी-हिंदी युक्त करून टाकली आहे. यासाठी मराठी वाचन, लिखाण, मराठी ऐकणे, मराठी बोलणे, मराठीत विचार आणि विश्लेषण करण्यास सुरुवात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अगदी मराठी भाषेत आपल्याला स्वप्न पडले पाहिजेत. कारण आपले जागृत मन ज्या भाषेत काम करीत असते, तीच भाषा आपल्यात विकास पावते, असे ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande