जळगाव, 3 ऑक्टोबर (हिं.स.) सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. अशात पुन्हा एक धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. अर्थात जिल्ह्याच्या काही भागांत पुन्हा जोरदार पाऊस होणार असून, यासाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
हा पाऊस संपूर्ण जिल्हाभर नसेल, मात्र ठराविक तालुक्यांमध्ये तो अधिक तीव्र असेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र आता मध्य भारत आणि विदर्भाकडे सरकत असल्यामुळे राज्यासह जळगाव जिल्ह्यातही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. या हवामानामुळे जिल्ह्यात १० ऑक्टोबरपर्यंत तरी पावसाची स्थिती कायम राहू शकते, त्यानंतर मान्सून पूर्णपणे परतण्याची शक्यता आहे. काढणीला आलेल्या पिकांचे या परतीच्या पावसाने मोठे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. यंदा ‘ला-निना’ स्थिती सक्रिय असल्याने, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात देखील बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात वेळोवेळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे रब्बी हंगामावरही अनिश्चिततेचे सावट कायम राहण्याची भीती आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर