छत्रपती संभाजीनगर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। धाराशिवयेथील बहुप्रतिक्षित केंद्रीय विद्यालयाला केंद्र सरकारकडून तत्वतः मंजुरी मिळाली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले. या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाठपुराव्याला यश..! असे म्हणत या निर्णयाचे स्वागत केले. धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालय व्हावे, यासाठी ते गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होते. जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि नागरिकांच्या मुलामुलींना केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमाचे दर्जेदार शिक्षण मिळावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या तत्वतः मंजुरीमुळे ती मागणी पूर्ण होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
केंद्रीय विद्यालयाला तत्वतः मंजुरी मिळाली असली तरी, अंतिम मंजुरीसाठी आता राज्य सरकारची भूमिका निर्णायक ठरणार आहे. खासदार निंबाळकर यांनी म्हटले आहे की राज्य सरकारने अंतिम मंजुरीसाठी परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या प्रक्रियेला गती देण्याची विनंती केली आहे.
राज्य सरकारकडून आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारला सादर झाल्यानंतरच अंतिम मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे आता धाराशिववासियांचे लक्ष राज्य सरकारच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis