बीड, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।
शेतकऱ्यांचे खाते होल्ड करू नयेत, अशा सूचना माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी बँकेच्या व्यवस्थापकांना दिलेल्या आहेत. आज माजलगाव मतदारसंघातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सर्व शाखा व्यवस्थापकांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या आहेत.
अतिवृष्टी व पुरामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर ती त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे खाते होल्ड करू नयेत, अशा सूचना यावेळी दिल्या.
शेतकऱ्यांकडून या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यासोबतच पिककर्ज वाटप, जुन्या व नवीन कर्जाचे वाटप तसेच बँकिंगशी संबंधित अडचणी यांबाबतही माहिती घेतली. शासकीय मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहील असे आ. प्रकाश सोळंके यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis