गडचिरोली, 3 ऑक्टोबर, (हिं.स.) मलेरिया निर्मूलन मोहिमेला गती देण्यासाठी सर्व संबंधित घटकांच्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे निश्चित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या.
मलेरिया निर्मूलनासाठी स्थापित अंमलबजावणी समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुजिता वाडिवे, महिला व बालकल्याण अधिकारी सौ. ज्योती कडू आदी मान्यवर उपस्थित होते.
तात्काळ उपचार व मृत्यू कमी करणे हा केंद्रबिंदू
मलेरियाच्या रुग्णसंख्येकडे पाहण्यापेक्षा लक्षणे दिसताच तात्काळ उपचार सुरू करून मृत्यू टाळणे हेच मूळ उद्दिष्ट असावे, असे स्पष्ट करत त्यांनी सर्व संबंधित विभागांना जबाबदारीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंची स्वतंत्रपणे छाननी करून त्यामागील वास्तविक कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. यामुळे कुठल्या टप्प्यावर दुर्लक्ष झाले आहे याची माहिती मिळून त्यावर त्वरित उपाय करता येतील.
टास्क फोर्स व समितीच्या सूचनांची अंमलबजावणी
मलेरिया निर्मूलनासाठी गठीत कार्यबल व अंमलबजावणी समितीच्या शिफारशी प्रत्यक्षात कितपत राबवल्या गेल्या याची माहिती घेण्यात आली. तसेच स्थानिक पुजारांकडे येणारी संशयित रुग्णांची प्रकरणे आरोग्य विभागाकडे पाठविल्यास प्रत्येक प्रकरणानुसार पुजारांना प्रोत्साहनपर मानधन देण्याच्या सूचनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
अधिक मनुष्यबळ व प्रशिक्षणाची गरज
बैठकीत तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मलेरिया प्रभावित क्षेत्रांमध्ये अतिरिक्त मनुष्यबळाची नेमणूक करणे तसेच विद्यमान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.
यावेळी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond