ठाणे, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करावा, या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे. येत्या 4 ऑक्टोबरला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बंजारा समाज आरक्षण समितीचे निमंत्रक कविराज चव्हाण यांनी दिली.
मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारावर ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. याच अनुषंगाने, हैदराबाद गॅझेटमध्ये 'बंजारा' जमातीचा 'आदिम' जमात म्हणून उल्लेख असल्यामुळे, त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाने केली आहे. त्या अनुषंगाने बंजारा समाजाच्या वतीने राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे.
अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी प्रथमच बंजारा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे. आतापर्यंत ३२ मोर्चे राज्यभर झाले आहेत. 4 ऑक्टोबरला ठाणे येथे सकाळी ११ वाजता बंजारा मोर्चा काढण्यात येणार आहे.
ठाण्याच्या मोर्चाला सेमीफायनल मोर्चा असे नाव दिले आहे. जर आम्हाला अनुसूचित जातीतील आरक्षण दिले नाही तर सबंध महाराष्ट्रभरातून बंजारा समाज मुंबईत धडक देणार आहे. आताचे मोर्चे म्हणजे ट्रेलर आहे पूर्ण सिनेमा अद्याप बाकी आहे. सरकारला आम्ही विनंती करीत आहोत की, राज्यभरातील मोर्चांची दखल घेऊन आम्हाला एसटीचे आरक्षण द्यावे अशी मागणी बंजारा समाज आरक्षण समितीचे निमंत्रक कविराज चव्हाण यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर