नांदेड, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी खडकूत येथे पीक कापणी प्रयोगाची पाहणी केली आहे. यावर्षापासून पीक विमा योजनेत नुकसान भरपाई निश्चित करताना पीक कापणी प्रयोगाला आधारभूत मानले जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची तांत्रिक चूक होऊ नये, शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळावा यासाठी जिल्हास्तरावर प्रात्यक्षिक स्वरूपात पीक कापणी प्रयोग राबविण्यात येत आहेत.
आज जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नांदेड तालुक्यातील मौजे खडकूत येथे शेतकरी बालाजी नागुराव कंकाळ यांच्या शेतावर सोयाबीन पिकाची कापणी करून उत्पन्नाचा अंदाज काढण्यासाठी आयोजित प्रात्यक्षिकाची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. कर्डीले यांनी शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाचे महत्त्व, पद्धती आणि त्यातून मिळणाऱ्या निष्कर्षांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी नुकसान भरपाईची रक्कम योग्य प्रकारे ठरविण्यासाठी पीक कापणी प्रयोग अत्यंत महत्त्वाचे असून त्यात पारदर्शकता व काटेकोरपणा आवश्यक आहे.
या प्रात्यक्षिकावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, मंडळ कृषी अधिकारी श्री. सानप, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. कासटेवाड, श्री. येवते, ग्राम महसूल अधिकारी, भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी, ग्रामस्तरीय पीक कापणी समितीचे सदस्य, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis