पुणे, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षातील (२०२५-२६) पहिल्या सहामहीत ६०७ काेटींचा मिळकत कर वसूल केला आहे. चार लाख ७८ हजार २६८ मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला. वाकड भागातून सर्वाधिक ७६ कोटी ४१ लाख, तर सर्वांत कमी पिंपरीनगर विभागीय कार्यालयातून चार कोटी ९२ लाखांचा कर वसूल झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा सात लाख ३५ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून महापालिकेचा कर आकारणी व कर संकलन विभाग कर वसूल करत आहे. एक एप्रिल ते ३० जूनपर्यंत मिळकत कर भरल्यास सामान्य करात दहा टक्के सवलत देण्यात आली.पहिल्या तीन महिन्यांत ३० जूनपर्यंत ५२२ कोटी ७२ लाख रुपयांचा भरणा महापालिका तिजोरीत झाला आहे. त्यानंतर पुढील तीन महिन्यांत देयक भरल्यास सामान्य करात चार टक्के सवलत देण्यात आली. त्यात ३० सप्टेंबरपर्यंत एकूण ६०६ कोटी ८२ लाखांचा मालमत्ताकर जमा झाला आहे. एक जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्यांत केवळ ८४ कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु