राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत - मंत्री अतुल सावे
मुंबई, 3 ऑक्टोबर (हिं.स.) : राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्यस्तरीय दुग्धव्यवसाय अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा उद्देश राज्यातील दूध उत्पादन कमी असलेल्या भागांमध्ये
राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत - मंत्री अतुल सावे


मुंबई, 3 ऑक्टोबर (हिं.स.) : राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्यस्तरीय दुग्धव्यवसाय अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा उद्देश राज्यातील दूध उत्पादन कमी असलेल्या भागांमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी दिर्घकालीन उपाययोजना सुचविणे आणि सहकारी व खाजगी दूध संघांसह शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करणे हा असल्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

मंत्री श्री. सावे म्हणाले, अभ्यास समितीचे अध्यक्ष आयुक्त, पशुसंवर्धन असून, सदस्य सचिव म्हणून आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास हे आहेत. समिती राज्यातील दुग्धव्यवसायाच्या परिस्थितीचा आढावा घेईल. तसेच, दूध उत्पादक शेतकरी, खाजगी व सहकारी दूध संघ यांचेकडून प्राप्त सूचना लक्षात घेऊन उपाययोजना सुचवण्याचे काम समिती करणार आहे.

समितीच्या कार्यात “विकसित महाराष्ट्र २०४७” या उद्दिष्टाचा विचार केला जाईल. राज्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन विभाग म्हणून कामगिरी करण्यासाठी देशभरातील विविध राज्यांतील योजना अभ्यासून सर्वोत्तम योजना राज्यात राबविण्याचे मार्गदर्शन समिती करणार आहे. ही अभ्यास समिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, दुग्ध उद्योगांचे प्रतिनिधी आणि प्रगतिशील दूध उत्पादक शेतकरी यांना आवश्यकतेनुसार आमंत्रित करेल.

समितीच्या मार्गदर्शनाखाली महिलांना दुग्धव्यवसायात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच बचतगट/शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, या बाबींचेही नियोजन केले जाणार असल्याचे मंत्री श्री .सावे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande