सुरगाणा, 3 ऑक्टोबर (हिं.स.)
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणारी ‘आनंदाचा शिधा योजना’ गेल्या वर्षभरापासून थांबली असून, गरीब कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. दीपावली, दसरा, गुढीपाडवा, गौरी-गणपती यांसारख्या सणासुदीच्या काळात केवळ १०० रुपयांत डाळ, साखर, तेल, रवा, मैदा अशा जीवनावश्यक वस्तूंचा संच (किट) लाभार्थ्यांना देण्यात येत होता. मात्र मे २०२४ पासून ही योजना बंद करण्यात आली असून, सध्या केवळ गहू व तांदूळच मिळत आहेत. त्यामुळे आधीच पावसाने बेजार झालेल्या नागरिकांना दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती झालेली आहे.
सुरगाणा तालुक्यात एकूण १९० स्वस्त धान्य दुकाने असून, त्यामधील १५,११३ अंत्योदय रेशन कार्ड तसेच १८,२३० प्राधान्य रेशन कार्ड लाभार्थी असे एकूण ३३,३४३ कुटुंबे या योजनेखाली येतात. आनंदाच्या शिध्यात मिळणाऱ्या किटमध्ये असलेली साखर, पामतेल, रवा, मैदा आणि तूरडाळ बाजारभावाने विकत घेणे सध्या महागाईच्या तडाख्यामुळे गरीब कुटुंबांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे, त्यामुळे या आनंदाच्या शिध्याचा गरजू कुटुंबाना लाभ होतं असतो.
आनंदाच्या शिधा बंद करून सध्यास्थिती देण्यात येणाऱ्या “गहू आणि तांदूळ यावर सण-उत्सव कसे साजरे करावे असा प्रश्न सामान्य नगरिकांना सतावत आहे. सणासुदीला शिधा थांबवून शासनाने आम्हाला अडचणीत टाकले आहे. ही योजना फक्त निवडणुकीत मते मिळवण्यासाठीच सुरू करण्यात आली होती का?” असा सवाल लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. निवडणुका आल्यावरच योजना सुरू होतात आणि नंतर थांबविल्या जातात, या शासनाच्या धोरणाविरोधात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असून, गरीब कुटुंबांना पुन्हा एकदा ‘आनंदाचा शिधा’ सुरू करावा, अशी मागणी ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
“तेल, डाळ, साखर बाजारातून विकत घेणे आमच्या सारख्या सामान्य कष्टकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे, ही योजना थांबवल्याने आम्ही सण- उत्सव कसे साजरे करावे आणि सण उत्सवात मुला-बाळांच्या तोंडात गोड घास कसा भरावा असा प्रश्न पडतोय. - कैलास बागूल, नागरिक
शासनाने ही योजना केवळ मतांसाठी सुरू केली होती का? निवडणुका झाल्या की योजना बंद होते. गरिबांची मतांसाठी करण्यात येणारी थट्टा थांबवावी.- संदीप भोये,नागरिक ,बोरगाव
१०० रुपयांत मिळणारा आनंदाचा शिधा आमच्यासाठी मोठा आधार होता. पुन्हा ही योजना सुरू करावी.- लिलाबाई बोरसे, हरणटेकडी, महिला लाभार्थी.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV