पुणे, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।
गांधर्व महाविद्यालय यावर्षी आपले शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांस्कृतिक समिती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवार दि. ६ ऑक्टोबर आणि मंगळवार दि. ७ ऑक्टोबर रोजी पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही दिवशी सायं. ५ ते रात्री ९ दरम्यान टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल येथील गणेश सभागृह या ठिकाणी सदर महोत्सव संपन्न होईल. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी.
महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी म्हणाले, यावर्षी संस्था आपले शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष सादर करीत आहे. संपूर्ण वर्षभरात (२०२५-२६) संस्थेच्या माध्यमातून अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ६ व ७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत महोत्सव याचाच एक भाग आहे. ६ ऑक्टोबर रोजी सायं ५ वाजता पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन संपन्न होईल. यानंतर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण होईल. त्यानंतर पुण्याच्या गायिका गायत्री गोखले यांचे गायन होईल. धारवाडचे प्रसिद्ध सतारवादक मोहसीन खान यांच्या सतारवादनाचा अनुभव उपस्थितांना घेता येईल. गायिका विदुषी पद्मा तळवलकर यांच्या शिष्या असलेल्या यशस्वी सरपोतदार यांच्या गायनाने महोत्सवाच्या पहिला दिवसाचा समारोप होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु