पुणे - जप्त वाहनांचा 15 ऑक्टोबर रोजी जाहीर ई-लिलाव
पुणे, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या वायुवेग पथकाद्वारे मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांमध्ये अटकावून ठेवलेली, मोटार वाहन कर न भरलेली तसेच हक्क सांगून सोडवून न घेतलेली एकूण ३८ वाहने जाहिर ई-लिलावाद्वारे विक्रीस ठे
पुणे - जप्त वाहनांचा 15 ऑक्टोबर रोजी जाहीर ई-लिलाव


पुणे, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या वायुवेग पथकाद्वारे मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांमध्ये अटकावून ठेवलेली, मोटार वाहन कर न भरलेली तसेच हक्क सांगून सोडवून न घेतलेली एकूण ३८ वाहने जाहिर ई-लिलावाद्वारे विक्रीस ठेवण्यात आला आहे.

हा जाहिर ई-लिलाव १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने www.cauction.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे.

वाहनांची पाहणी दि. ०६ ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व वेळेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे तसेच हडपसर बस डेपो, राजगुरुनगर पोलीस स्टेशन आणि शेवाळवाडी बस डेपो येथे करता येईल.

ई-लिलावात सहभागी होण्यासाठी ०६ ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत www.cauction.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक असून, अर्जदाराकडे डी.एस.सी. असणे बंधनकारक आहे. नाव नोंदणी व पडताळणीसाठी ऑनलाईन अर्जासोबत दुचाकी वाहनांसाठी अनामत रक्कम रु. दहा हजार व ट्रक, मिनीबस, बस, स्लीपर बस इत्यादी वाहनांसाठी रु. पन्नास हजार अनामत रकमेचा डिमांड ड्राफ्ट (RTO Pune या नावे) सादर करणे आवश्यक आहे.

लिलावाच्या अटी व नियम ०३ ऑक्टोबर पासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथील नोटीस बोर्डावर उपलब्ध राहतील. वाहने जशी आहेत तशी या तत्वावर विकली जाणार असून, सदर ई-लिलाव रद्द अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, पुणे यांच्याकडे राखीव आहेत.

वाहन मालक, चालक, वित्तदाते किंवा ज्या कोणाचे हितसंबंध आहेत त्यांनी लिलावाच्या तारखेपूर्वी महसूल भरून किंवा हक्क सांगून वाहने सोडवून घेता येतील. लिलावानंतर कोणतीही हरकत ग्राह्य धरली जाणार नाही, असेहीआवाहन कराधान प्राधिकारी तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande