सोलापूर, 3 ऑक्टोबर, (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेस जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) निधीतून मंजूर झालेल्या ३८ घंटागाड्यांपैकी पहिल्या टप्प्यात खरेदी करण्यात आलेल्या २५ घंटागाड्यांचे लोकार्पण आज महापालिकेच्या इंद्रभुवन येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाले.या लोकार्पण सोहळ्याला आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वीणा पवार व संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक अनिल चराटे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, मुख्य आरोग्य निरीक्षक नागेश मेंडगुळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री गोरे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेस एकूण ३८ घंटागाड्यांची मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी २५ गाड्यांचे आज लोकार्पण करण्यात आले असून उर्वरित गाड्यांची खरेदी लवकरच पूर्ण होणार आहे.नवीन घंटागाड्यांमुळे शहरातील कचरा संकलन व्यवस्थेत अधिक गती येणार असून “दरवाजा-दरवाजा कचरा संकलन” उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहे. नागरिकांना वेळेत व सुटसुटीत सेवा मिळेल, तसेच शहर स्वच्छता मोहिमेला बळकटी मिळून सोलापूर हे स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी शहर बनविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड