पुणे, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबविण्यात येणारे सहअभ्यासक्रम (को-करिक्युलर्स कोर्स) तयार करण्यात येतील. लवकरच ते विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतील,’’ अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत देण्यात आली. तसेच, दोन क्रेडिटसाठी असणाऱ्या या अंतर्गत मूल्यमापन अभ्यासक्रमासाठी या सत्रात पुरेसा वेळ मिळाला नसेल, तर संबंधित महाविद्यालयांनी या अभ्यासक्रमांचे गुणांकन पुढील सत्रात करावे, असेही विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी स्पष्ट केले.विद्यापीठाच्या अधिसभेच्या दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तरांदरम्यान डॉ. काळकर यांनी ही माहिती दिली. सदस्य डॉ. रमेश गायकवाड यांनी ‘सहअभ्यासक्रमाअंतर्गत किती विषयांचा अभ्यासक्रम तज्ज्ञांकडून तयार करून घेतला?’ असा प्रश्न विचारला. त्याला व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी दिलेल्या उत्तरात विद्यापीठाने स्वयम प्रणालीतून हे अभ्यासक्रम घेतल्याची माहिती समोर आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु