
सोलापूर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।
जुबेरकडे कुख्यात दहशतवादी लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर सापडले आहे. तसेच ‘अल कायदा इन्स्पायर’ मासिकातील एके-४७ रायफलने गोळीबार करण्याची आणि बॉम्ब तयार करण्याची पद्धत, याचे छायाचित्र व माहितीदेखील सापडली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर-जिल्ह्यातील व अन्य जिल्ह्यांमधील किती कट्टरतावादी तरुण मुले जुबेरच्या संपर्कात आहेत, त्याचे सोलापूर शहरात, मोहोळ, वळसंग अशा भागात कोणाकोणाशी जास्त संपर्क होता, याची माहिती पोलिस काढत आहेत. त्या अनुषंगाने दहशतवादविरोधी पथक (एटीएस) सोलापुरातही येऊ शकते.
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने बंदी घातलेल्या ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला पुणे एटीएसने अटक केली आहे. जुबेर हंगरगेकर (वय ३५) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा सोलापूर शहरातील रहिवासी असून, सात वर्षांपूर्वीच तो पुणे येथील कोंढवा भागात राहायला गेला आहे. जुबेर १८ ते २० ऑक्टोबरपर्यंत सोलापुरात होता.
या काळात वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारी जवळील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील कार्यक्रमात जुबेर व त्याचे मित्र सहभागी झाले होते, अशी माहिती आता पुढे आली आहे. त्या शाळेतील प्राचार्य व शिक्षकांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.
जुबेरच्या लॅपटॉपमध्ये ‘अल-कायदा’शी संबंधित साहित्य डाऊनलोड केलेले आढळले. न्यायालयाने जुबेरला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मूळचा सोलापूरचा जुबेर हा कल्याणी नगरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. ‘अल-कायदा’च्या सदस्यांशी जुबेरचा काही संबंध होता का?, त्या अनुषंगाने पोलिसांकडून मित्रांचीही चौकशी करीत आहेत. त्यासाठी मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली जात आहे. तसेच तो इतर दहशतवादी संघटनेशी संपर्कात होता का? याचीही चौकशी सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड