
गडचिरोली., 30 ऑक्टोबर (हिं.स.)
ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या कायदेशीर अडचणींचे निराकरण करण्यासाठी आज मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा प्रीति हिरुळकर, नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प अर्चना राऊत कोचरे, कृषि उपसंचालक आत्मा धर्मेंद्र गिरिपुंजे, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाचे प्रफुल्ल भोपये तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून चार्टर्ड अकाउंटंट समीर मस्के आणि पॅलॅडियम संस्था विभागीय अंमलबजावणी कक्ष नागपूर येथील Agriculture Associate निखिल कोळी यांनी मार्गदर्शन केले.
या चर्चासत्रात स्मार्ट प्रकल्पांतर्गत मंजूर झालेल्या कृषि विभाग, उमेद आणि मावीम यांच्या शेतकरी उत्पादक कंपनींचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विविध कायदेशीर बाबींची, लेखा-पद्धती, कर-नियम, संस्थेची नोंदणी, लेखापरीक्षण, तसेच शाश्वत व्यवसाय नियोजन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मार्ट प्रकल्पाचे अर्थशास्त्र व वित्तीय प्रवेश सल्लागार कैलास शहारे यांनी केले. त्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना तांत्रिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून सातत्याने पाठबळ दिले जाईल, असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एम.आया.एस. तज्ञ राहुल मदनकर यांनी केले.
या चर्चासत्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना कायदेशीर आणि आर्थिक सल्लामसलत मिळाल्याने भविष्यात त्यांचा व्यवसाय अधिक सुयोजित आणि टिकाऊ स्वरूपात पुढे नेण्यास मदत होईल, असे मत सहभागी संचालकांनी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond