
जळगाव, 30 ऑक्टोबर (हिं.स.) तालुक्यातील रामदेववाडी परिसरात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पायी जात असलेल्या तरुणाला जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आणि उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली असून, याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत तरुणाचे नाव मुकेश अभिसिंग राठोड (२१, रा. रामदेववाडी, ता. जळगाव) असे असून, तो आपल्या आई-वडिलांसोबत वास्तव्याला होता. मुकेश हा बांधकाम क्षेत्रात बिगारीचे काम करून उदरनिर्वाह करत होता. बुधवारी रात्री तो गावातील चायनीज दुकानावरून नाश्ता करून पायी घरी परतत असताना, मागून आलेल्या भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत मुकेश गंभीर जखमी झाला. घटनास्थळावर जमलेल्या नागरिकांनी त्याला तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मुकेशच्या निधनाने संपूर्ण रामदेववाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, त्यांच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. एकुलता एक मुलगा गमावल्याने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर