
रायगड, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। परतीच्या पावसाने कोकणातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून हाता-तोंडाशी आलेला घास अक्षरशः मातीमोल झाला आहे. शेतकऱ्यांच्या या बिकट परिस्थितीबाबत कुणबी समाज, म्हसळा यांच्या वतीने तहसीलदार सचिन खाडे यांना निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात तालुका उपाध्यक्ष दिलीप मांडवकर, मुंबई अध्यक्ष महेंद्र टिंगरे, सरचिटणीस राजाराम तिलटकर, मुंबई सरचिटणीस राजू धाडवे यांच्यासह लहु तुरे, गजानन शिंदे, अनिल टिंगरे, गोपीनाथ सावंत, दिपेश जाधव, जयेश जाधव, दिनेश पाडवे, शंकर घोलप, मिलिंद मोरे, सौ. अर्पिता धोकटे, म्हस्कर, जयवंत मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कुणबी समाजाचे म्हणणे आहे की, शेती करणारा हा समाज व त्यासोबत अठरापगड जातीचा शेतकरी वर्ग निसर्गाशी झगडत शेती करतो. मात्र या वर्षीच्या परतीच्या पावसाने सर्व मेहनत वाया गेली आहे. सरकारकडून मिळणारी नुकसानभरपाई तुटपुंजी असून ती शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे, अशी खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली.
या निवेदनात म्हटले आहे की, “शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसानभरपाईचे मूल्यांकन करून शंभर टक्के मदतनिधी त्वरीत वितरित करावा. अन्यथा शेतकरी आणि बहुजन समाज एकत्र येऊन सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरेल.” कुणबी समाजाने कोकणातील शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची शासनपातळीवर पाहणी केली जाते, मात्र कोकणातील शेतकऱ्यांचे कोणीही हाल विचारत नाही, असा सवाल निवेदनात उपस्थित करण्यात आला.
तसेच पावसामुळे गुरांच्या चाऱ्याचे आणि वैरणीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके