
जळगाव, 30 ऑक्टोबर (हिं.स.)अमळनेर तालुक्यातील सारबेटे खुर्द गावात मध्यरात्री १ ते पहाटे ५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एका घरातून तब्बल २ लाख ३३ हजार ९०० रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. या चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भीमराव पुना पाटील (वय ६४, रा. सारबेटे खुर्द, ता. अमळनेर) यांच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे कडी-कोयंडे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून चोरटे फरार झाले. चोरट्यांनी घरातून दोन सोन्याच्या चैन, एक माळ, तीन अंगठ्या, दोन टोंगल, सोन्याचे किल्लू आणि काप असा सोन्याचा ऐवज तर चांदीचा करदोडा, वाळ्या, कमरपट्टा, कडे आणि चांदीच्या देवीच्या मूर्त्या असा चांदीचा ऐवज तसेच रोकड रक्कम चोरून नेली. एकूण मुद्देमालाची किंमत २ लाख ३३ हजार ९०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर