
जालना, 30 ऑक्टोबर, (हिं.स.)महसूल व पोलीस प्रशासनाने अवैध वाळु चोरी विरोधात संयुक्त कारवाई करावी. प्रत्येक तालुक्यातील अवैध वाळु वाहतुक असलेली ठिकाणे तहसीलदार व पोलिस विभागाने निश्चित करावे. अशा ठिकाणी सीसीटिव्ही लावण्याची कारवाई करण्यात यावी. तरी जिल्ह्यातील वाळुची अवैध वाहतुक करणाऱ्या तस्करांना तडीपार करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध वाळु उपसा रोखण्यासाठी विशेष बैठक पार पडली, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, प्र.अपर जिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, जिल्हा खनिकर्म अधिकारी तुषार निकम यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार आदि प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल म्हणाल्या की, जिल्ह्यातील वाळुची अवैध वाहतूक रोखण्यासाठी ड्रोनचा वापर करावा तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात रस्त्यावर धावणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर, टिप्पर, ट्रक आणि हायवा यासह इतर वाहनावर तात्काळ कारवाई करावी. तसेच तहसील कार्यालय व पोलिस ठाणे येथे दंडात्मक कार्यवाहीतील वसुली प्रलंबित असलेल्या वाहनांचा त्वरीत लिलाव करण्यात यावा. एमपीडीएम कायद्याचा वापर कमी होत असल्याने अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने स्थानबध्दता होण्यासाठी कारवाई करावी. वाळुची चोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक लवकरच उपलब्ध करुन दिला जाणार असून त्यावर अचुक माहिती देवून अवैध वाळुची वाहतुक करणारे वाहन पकडले गेल्यास त्या व्यक्तीला 5 हजार रुपयांचे बक्षिसही दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis