जळगावात जीएसटी विभागाची धाड; दोन दुकाने सील
जळगाव, 30 ऑक्टोबर (हिं.स.) शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र बळीरामपेठेत राज्य जीएसटी विभागाच्या इन्व्हेस्टिगेशन पथकाने धाड टाकून दोन मोठ्या दुकानांवर छापा मारला. दिवसभर चाललेल्या तपासणीनंतर महादेव गारमेंट्स आणि श्री साईनाथ ट्रेडर्स या दोन दुकाने रात
जळगावात जीएसटी विभागाची धाड; दोन दुकाने सील


जळगाव, 30 ऑक्टोबर (हिं.स.) शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र बळीरामपेठेत राज्य जीएसटी विभागाच्या इन्व्हेस्टिगेशन पथकाने धाड टाकून दोन मोठ्या दुकानांवर छापा मारला. दिवसभर चाललेल्या तपासणीनंतर महादेव गारमेंट्स आणि श्री साईनाथ ट्रेडर्स या दोन दुकाने रात्री उशिरा सील करण्यात आली असून, या दोन्ही ठिकाणांवरील व्यवहाराची रजिस्टर व कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. यामुळे व्यापारी बांधवांमध्ये खळबळ उडाली आहे. दिवाळी काळात परराज्यातून मोठ्या प्रमाणात माल आयात झाल्यानंतरही या व्यवहारांची योग्य नोंद जीएसटी विभागाकडे झालेली नसल्याची किंवा कमी दाखवल्याची शंका असल्याने ही कारवाई करण्यात आली. विभागाकडे मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्य जीएसटीच्या इन्व्हेस्टिगेशन टीमने बळीरामपेठेतील दोन्ही दुकानांवर सुमारे चार तास तपासणी केली. व्यवहारांशी संबंधित सर्व दस्तऐवज, रजिस्टर आणि जीएसटीची नोंदी तपासल्यानंतर दोन्ही दुकाने रात्री ८ वाजता सील करण्यात आली.

दरम्यान, गुरुवारीही या दोन्ही सीलबंद दुकानांमधील कागदपत्रांची बारकाईने छाननी सुरू राहणार असून, प्राथमिक तपासात अनियमितता आढळल्यास मोठी आर्थिक कारवाई होण्याची शक्यता आहे. या छापेमारी मोहिमेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे. बळीरामपेठेत जीएसटी विभागाचे अधिकारी कारवाई करत असल्याची बातमी पसरताच सायंकाळी अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने घाईघाईने बंद करून घरचा रस्ता धरला. विभागाने पुढील काही दिवसांत इतर ठिकाणीही अशा तपासण्या सुरू ठेवण्याचे संकेत दिले असून, त्यामुळे जळगावमधील व्यापारवर्तुळात सावधगिरी आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande