
पुणे, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।
खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडल्यानंतर वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीपासून एकतानगर परिसराला दिलासा मिळावा, यासाठी पुणे महापालिकेने नदीकाठ सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प राजाराम पूल ते वारजे या दरम्यान होणार होता.
पण आता याची लांबी वाढवून तो नांदेडसिटी- शिवणेपर्यंत केला जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च ३०० कोटीवरून ४५० कोटीवर जाणार आहे. या प्रकल्पाची निविदा पुढील आठवड्यात निघणार आहे अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे खडकवासला धरणातील साठा वाढल्याने मुठा नदीतील विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे एकतानगर, विठ्ठलनगर आणि निम्बजनगर येथील अनेक घरात पुराचे पाणी शिरले होते. यात नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या भागाला भेट देत तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना केल्या होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु