पिंपरी चिंचवड महापालिकेचा सात महिन्यांत ६२४ कोटी ८५ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल
पुणे, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत पहिल्या सात महिन्यांतच तब्बल ६२४ कोटी ८५ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. चालू आर्थिक वर्षात नागरिकांचा वा
पिंपरी चिंचवड महानगरपालिका


पुणे, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत पहिल्या सात महिन्यांतच तब्बल ६२४ कोटी ८५ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. चालू आर्थिक वर्षात नागरिकांचा वाढता प्रतिसाद,विभागाचे नियोजनबद्ध कामकाज आणि विविध सवलतींचा लाभ या सर्व घटकांमुळे कर संकलनात विक्रमी वाढ झाली आहे. शहरात सध्या एकूण ७ लाख ४० हजार मालमत्तांची नोंद असून,त्यापैकी ४ लाख ७८ हजार मालमत्ताधारकांनी आतापर्यंत कर भरणा केला आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही,त्यांनी तो लवकरात लवकर भरावा,असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तुलनेत यंदा ऑक्टोबर महिन्यात कर वसुलीचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १ एप्रिल २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२४ या काळात ५४२ कोटी ६० लाख रुपये इतका मालमत्ता कर वसूल झाला होता. त्याच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात पहिल्या सात महिन्यांत म्हणजेच १ एप्रिल २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ६२४ कोटी ८५ लाख रुपये म्हणजेच तब्बल ८२ कोटी २५ लाख रुपयांचा मालमत्ता कर अधिक वसूल झाला आहे.

पहिल्या व दुसऱ्या तिमाहीत नागरिकांनी कर भरण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून विभागाने विविध सवलती जाहीर करण्यासोबतच मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यावर भर दिला होता. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक करदात्यांनी ऑनलाईन पर्यायांचा वापर करून घरबसल्या कराचा भरणा केला,तर काहींनी महापालिकेच्या काऊंटरवर थेट कराचा भरणा केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande