
ठाणे, 30 ऑक्टोबर, (हिं.स.)। बहरीनमध्ये झालेल्या यंदाच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्डल्स या खेळप्रकारात ठाण्याच्या शौर्या अंबुरे हिने रौप्यपदक प्राप्त केले. तर चौथ्या दक्षिण आशियाई वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत हर्ष राऊत याने रिले या खेळप्रकारात रौप्यपदक प्राप्त केले. या दोन्ही खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत असून आज ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणेकरांच्यावतीने या दोन्ही खेळाडूंचा सन्मान केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मीनल पालांडे,अतिरिक्त पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, रुपाली अंबुरे ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव अशोक आहेर, सहसचिव राजेंद्र मयेकर, कोषाध्यक्ष भूपेंद्र ठाणेकर, सदस्य एकनाथ पोवळे, ज्येष्ठ सांख्यिकी तज्ज्ञ रमेश खारकर,प्रशिक्षक अजित कुलकर्णी, निलेश पाटकर तसेच खेळाडूंचे पालक उपस्थित होते.
शौर्या अंबुरे हिने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी साधताना 100 मीटर हर्डल्स शर्यतीत 13:73 सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवलं. शौर्या ही 16 वर्षीय खेळाडू ठाण्यातील युनिव्हर्सल स्कूल मध्ये शिकत आहे. तर हर्ष राऊत याने १०० मीटर रिलेमध्ये रौप्य पदक जिंकून त्याचे दुसरे आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त केले. हर्ष राऊत हा ठाणे महानगरपालिकेच्या ॲथलेटिक्स असोसिएशनचा खेळाडू आहे.
ठाणे महानगरपालिका ही उत्तमोत्तम खेळाडू घडविण्यासाठी विविध प्रशिक्षण योजना राबवित आहे. तसेच खेळाडूंना आवश्यक असलेल्या सोईसुविधा ही महापालिकेच्या माध्यमातून देत असून असून महापालिका कायमच खेळाडूंच्या पाठीशी असल्याचे सांगत आयुक्त सौरभ राव यांनी या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्याकडून नियमित सराव करुन घेणारे त्यांचे प्रशिक्षक अजित कुलकर्णी, निलेश पाटकर यांच्या देखील आयुक्तांनी सन्मान केला असून या मुलांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पालकांचेही कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर