
सोलापूर, 30 ऑक्टोबर, (हिं.स.)। युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे तसेच राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणे या उद्देशाने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारतर्फे प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सन 2025-26 या वर्षासाठी विकसित भारत चॅलेज ट्रॅक अंतर्गत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन दिनांक 10 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा क्रीडा परिषद मधून खर्च करावा व शासनाकडून निधी प्राप्त झाल्यावर क्रीडा परिषदेला निधी वर्ग करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देऊन हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सूचित केले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित जिल्हास्तर युवा महोत्सव आयोजनाच्या अनुषंगाने आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार तसेच अन्य समिती सदस्य उपस्थित होते.
युवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून, त्यामध्ये सांस्कृतिक व नवोपक्रम (Cultural and Innovation Track) या दोन प्रमुख मार्गांचा समावेश आहे. जिल्हास्तर व विभागस्तरावरील स्पर्धा दिनांक 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत पार पडणार असून, त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धा दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहेत. विज्ञान प्रदर्शन हे नवोपक्रम ट्रॅक अंतर्गत फक्त राज्यस्तरापर्यंतच मर्यादित राहणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी दिली.
सांस्कृतिक व कौशल्य विकास स्पर्धांमध्ये खालीलप्रमाणे सहभाग निश्चित करण्यात आला आहे: लोकनृत्य (गट) – 10, लोकगीत (गट) – 10, कथालेखन – 03, चित्रकला – 02, वक्तृत्व – 03, कविता लेखन – 30. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या नियमावलीनुसार वेळ, सहभाग संख्या व इतर अटी लागू राहतील. लोकनृत्य व लोकगीत गटांमध्ये वाद्यवृंदाची संख्या निर्धारित सहभाग संख्येमध्ये अंतर्भूत राहील. या युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी युवक/युवतींचा वयोगट दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी 15 ते 29 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. जन्मतारीख दर्शविणारे सबळ पुरावे सादर करणे बंधनकारक आहे, असे श्री. पवार यांनी सांगितले. नवोपक्रम ट्रॅक अंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शासनाकडून रुपये 50,000 इतके अनुदान मंजूर करण्यात आले आहे, असे ही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड