
मुंबई, 30 ऑक्टोबर, (हिं.स.)। मविआच्या 1 नोव्हेंबरला निघणा-या मोर्चाच्या उबाठा गटाच्या पोस्टरवर उबाठा गटाने हिंदू जिमखाना या स्थळाचा उल्लेख टाळत फॅशन स्ट्रीटवरून मोर्चा निघेल असा उल्लेख केला आहे. मनसेने मात्र याच मोर्चाच्या पोस्टरवर हिंदू जिमखान्यापासून मोर्चाची सुरुवात असा उल्लेख केला आहे. उबाठा गटाला पोस्टरवर हिंदू हा शब्द लिहीण्याची लाज वाटते. हिरवी मते गमावण्याच्या भीतीपोटी हिंदू जिमखाना ऐवजी फॅशन स्ट्रीट पासून मोर्चाची सुरुवात असा उल्लेख केला, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊत आणि उबाठा गटाला हिंदूंची अॅलर्जी असल्याचे पुन्हा सिद्ध झाल्याचेही ते म्हणाले.
1 नोव्हेंबरला निघणा-या मविआच्या मोर्चात मनसेने सहभागी होण्याआधी राज ठाकरे यांनी मविआच्या 30 खासदारांना राजीनामा देण्यास सांगावे. लोकसभेत 48 पैकी 30 जागा मविआला मिळाल्या की आयोगाची यंत्रणा चोख काम करते. मात्र विधानसभेला पराभव झाल्यावर मत चोरीची आवई उठवली जाते. राज ठाकरेंनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन पूर्वी मविआ नेत्यांच्या दुटप्पीपणाला विरोध करावा, असा सल्लाही श्री. बन यांनी दिला. मतदारयादीतील चुका दुरुस्तीसाठी आयोगाकडे मागणी करण्यात यावी याबाबत भाजपा सहमत आहे. पण राहुल गांधींपासून आदित्य ठाकरेंपर्यंत सर्वजण याबाबत कायदेशीर मार्गाने आयोगाकडे तक्रार न करता थेट मीडियासमोर जाऊन खोटेनाटे आरोप करून निवडणूक यंत्रणेवर, लोकशाही यंत्रणेवर आणि मतदारांवर संशय व्यक्त करतात, असेही श्री. बन यांनी नमूद केले.
बच्चू कडू यांच्याबरोबरची चर्चा यशस्वी होणार
शेतक-यांच्या आशीर्वादाने सत्तेवर आलेले महायुती सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी याआधीच 32 हजार कोटींची मदतीची घोषणा झाली आहे. आणखी 11 हजार कोटींची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतला आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती. परवानगी देतानाच आंदोलनादरम्यान सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणार नाही असेही त्यांनी कोर्टात लिहून दिले होते. मात्र प्रत्यक्षात कशाप्रकारचे आंदोलन झाले हे सर्वांनी पाहिले. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी महायुती सरकारचे दरवाजे खुले असून चर्चेला बोलावले तेव्हा श्री. कडू आले नाहीत. आजच्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस नक्की मार्ग काढतील असा विश्वास श्री. बन यांनी व्यक्त केला.
शाळेमध्ये ‘वंदे मातरम’ सुरू होणार असल्याबद्दल अबू आझमी यांना चीड येण्याचे काय कारण असा परखड सवाल करत श्री. बन यांनी आझमी यांना लक्ष्य केले. ‘वंदे मातरम ‘हा कुठल्या पक्षाचा नाही तर देशाचा आणि देशभक्तीचा नारा आहे. आपण भारतात राहतो त्या भूमीला वंदन करणे म्हणजे ‘वंदे मातरम’ आहे. भारतात रहायचे असेल तर ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ म्हणावेच लागेल या शब्दांत श्री. बन यांनी खडसावले. ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ ची एलर्जी असेल तर आझमी यांनी खुशाल पाकिस्तान मध्ये जावे असेही श्री. बन यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी शरद पवार आणि 'एमसीए' च्या संबंधावर बोलावे
भाजपा आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) बाबत तोंडवर करून बोलण्यापूर्वी राऊतांनी शरद पवार आणि एमसीएच्या संबंधावर बोलावे असे आव्हान श्री. बन यांनी दिले. मिलिंद नार्वेकर हे एमसीएचे सदस्य आहेत राऊतांना जर एमसीएमध्ये राजकारण घुसू नये असे वाटत असेल तर त्यांनी शहाजोगपणाचा सल्ला सर्वप्रथम शरद पवारांना त्यानंतर श्री. नार्वेकरांना द्यायला हवा. खेळात राजकारण करण्याची सुरुवात श्री. पवारांनी केली. भाजपा खेळामध्ये राजकारण आणत नाही. खेळाडूंच्या सुविधा आणि खेळाचा दर्जा सुधारण्यासाठी भाजपाचे प्रतिनिधी 'एमसीए' मध्ये जात आहेत असे श्री. बन यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर