
छत्रपती संभाजीनगर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।
अहिल्यानगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील येथील रहिवासी असलेल्या जितेंद्र बापू खेडकर यांनी आपल्या आयुष्यातील एक अत्यंत अभिमानास्पद क्षण श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी अर्पण केला. भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेची संधी मिळाल्यानंतर त्यांनी आपला पहिला पगार श्री तुळजाभवानी देवींना अर्पण करून आपल्या जीवनातील नव्या प्रवासाची सुरुवात मातृशक्तीच्या आशीर्वादाने केली.
आज सकाळी जितेंद्र खेडकर हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह श्री क्षेत्र तुळजापूरात दाखल झाले होते. त्यांनी अत्यंत भक्तिभावाने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले आणि आपला पहिला पगार देवींच्या चरणी अर्पण केला.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांनी श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा भेट देऊन जितेंद्र खेडकर यांचा सन्मान केला. यावेळी मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
माझे हे यश देवीच्या कृपेने शक्य झाले आहे. सैन्यात भरती होणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे माझा पहिला पगार देवीच्या चरणी अर्पण करणे हे माझे कर्तव्य आहे. अशा भावना जितेंद्र खेडकर यांनी व्यक्त केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis