
सोलापूर, 30 ऑक्टोबर, (हिं.स.)। शहरात प्लेटलेटस् पिशव्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने डेंगी व कर्करुग्णांच्या नातेवाइकांची एकच धावाधाव सुरु आहे. सिंगल डोनर प्लेटलेट्सची एकही रक्त पिशवी सध्या उपलब्ध नाही. यामुळे स्थानिकसह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातून येणाऱ्या रुग्णांना उपचाराअभावी राहण्याची वेळ आली आहे.
शहरात वर्षभर डेंगीचा जोर कायम असतो. या आजारात रक्तातील प्लेटलेट्सच्या पेशींची झपाट्याने संख्या कमी होते. त्यामुळे या रुग्णांसाठी कायम प्लेटलेट्सची गरज भासते. तसेच कर्करोगाचे रुग्ण, विषाणूजन्य आजार, गंभीर संसर्गाचे आजारात प्लेटलेटस् रक्तघटकांचा पुरवठा करावा लागतो. या शिवाय अचानक ताप किंवा आजारात देखील अतिरिक्त प्लेटलेटस् देण्याची शिफारस केली जाते.
कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात उपचारासाठी रुग्ण सोलापुरात येतात. मात्र या रुग्णांची संख्या भरपूर असली तर प्रत्यक्षात रक्तदाते हे स्थानिकच असतात. तसेच दात्यांची संख्याही मर्यादित असते, यामुळे प्लेटलेट्सची गरज त्यापेक्षा जास्त रुग्ण असल्याने रक्त पेढी यंत्रणेवर मोठा भार पडतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड