
सोलापूर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। वनविभागात सापांची अंडी कृत्रिम पद्धतीनं उबवण्यात वनविभागास यश आले आहे. ७० दिवसानंतर या पिल्ल्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वनविभागाचे रेस्क्यूअर प्रविण जेऊरे यांना अत्तार नगर परिसरात कंपाऊंड मध्ये साप असल्याची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी घटनास्थळी बारकाईने पाहणी केली तेव्हा सापासोबत त्याची अंडी आढळली.
एकूण १३ अंडी होती. जेऊरे यांनी तेरा अंड्यांना बरणीत सुरक्षितपणे ठेवले. त्यानंतर या अंड्यांना ७० दिवस कृत्रिम वातावरणात उबवले. त्यानंतर ही पिले जन्मास आली. त्यासाठी उपवसंरक्षक कुलराज सिंग, सहा. वनसंरक्षक अजित शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रोहितकुमार गांगर्डे, इरफान काझी वनपाल, अनिता शिंदे वनरक्षक आणि वनविभाग रेस्क्यूअर प्रविण जेऊरे, कृष्णा निरवणे, शिवराज चिवडशेट्टी, देवराज मुडगी यांनी काम केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड